बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत शासकिय संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे.

या प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना येथील अभिजीत कडुबा बावस्कर यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपींनी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून शासकीय प्रक्रियेचा गैरवापर करीत आर्थिक लाभासाठी नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी नामे बिड्डराज प्रमोद यादव (वय २४, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) हा आपले वास्तव्य वारंवार बदलत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर २३ डिसेंबर २०२५ रोजी पटना, सिमरी बख्तियारपूर व सहरसा परिसरात शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप, आयफोन, थंब मशीन असा सुमारे १ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीस २८ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक तसेच सहरसा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली, असे परिवहन आयुक्त, मुंबई यांनी कळविले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादांच्या शौर्याला नमन

शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *