रूग्णांकडून (Medical patients) लाखो रूपये वसूल करण्याच्या वेगवेगळी प्रकरणाने वैद्यकिय सेवाही (Health service) बदनाम होत असताना एका हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. वैद्यकीय सेवेच्या बदल्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका रुग्णाने आपल्या डॉक्टरला चक्क कोंबडी (chicken) भेट म्हणून दिल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नेरळ येथे घडली, जिथे रुग्णाला उपचारानंतर बरे वाटले आणि त्याने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडला.
चार महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील (raigad) कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागातील ताडवाडीच्या बुधाजी हाबड्या मांगे या ७० वर्षीय वृद्धाच्या पायाला गंभीर जखम झाली होती. झाडपाल्याच्या उपचारांनंतर जखम वाढत गेली, त्यात आळ्या पडल्या आणि ते अत्यंत घाबरून उपचारासाठी नेरूळ येथे वैद्यकिय सेवा देत असलेले डॉ. गिरीश गायकवाड (Dr.Girish Gaikwad) यांच्याकडे आले. डॉ. गिरिश गायकवाड यांनी “सगळं ठीक होईल,” असं सांगत रूग्ण व त्यांच्या कुटूंबियांना दिलासा दिला.
रुग्ण हा एका ग्रामीण आदिवाशी भागातील रहिवासी होता. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने गायकवाड यांनी नाममात्र फी घेत वेळोवेळी रूग्णाचा फॉलोअप घेतला. डॉ.गायकवाड यांच्या वैद्यकिय उपचारामुळे दहा दिवसांतच जखम भरली. रूगणाला बरे वाटू लागले.
त्यामुळे त्याने आपल्या घरातील एक कोंबडी डॉक्टरांना भेट देण्याचे ठरवले. उपचारानंतर रुग्णालयात आलेल्या या रुग्णाच्या कुटूंबियांनी कोंबडी हातात घेऊन डॉक्टरांचे आभार मानले आणि म्हणाला, “डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या आजोबांना बरे केल्याने ही आमच्याकडून छोटीशी भेट आहे.”
डॉ.गिरीश गायकवाड यांनी ही भेट हसतमुखाने स्वीकारली आणि रुग्णाच्या साधेपणाने प्रभावित झाले. ” मूळ निवासी आदिवासी समाजाची कृतज्ञता ही खरी अफाट असते. ही भेट माझ्यासाठी खूप मोलाची आहे, कारण अशी पंख लावून समोर आलेली कृतज्ञता, माझ्यासारख्या खवय्याला केवळ समाधानच देत नाही, तर डॉक्टर म्हणून एक गहिरी आत्मिक समृद्धी देऊन जाते. यातून रुग्णाचा प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता दिसते,” असे डॉक्टर गिरीश गायकवाड यांनी सांगितले.
या घटनेने परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी रुग्णाच्या भावनेचे कौतुक केले आहे. ही छोटीशी घटना मानवतेचा आणि साधेपणाचा एक सुंदर नमुना ठरली आहे.
डॉ. गिरीश गायकवाड यांच्या वैद्यकीय सवेचा आदर्श
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावात जन्मलेल्या डॉ. गिरीश गायकवाड यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी इथून B. A.M.S. चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या वीस वर्षापासून ते रायगड जिल्ह्यातील नेरळ जवळील कळंब या आदिवासी गावांमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. जागतिक महामारी कोविड-19 सुरू असतानाही अविरत वैद्यकीय सेवा देताना डॉ. गिरीश गायकवाड यांनी रुग्णांना त्यांच्या गाडीतच सलाईन लावून दिल्याची घटना देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. कोविड महामारी दरम्यान पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांना देखील त्यांनी भरभरून मदत केली होती.
Marathi e-Batmya