तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवट्या… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल एक्स एकाऊंटवरून ट्विट

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्सवरील ट्विटवरून केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच असल्याची टीका केली.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोपही केला.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी असा टोलाही लगावला.

About Editor

Check Also

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत शासकिय संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *