शिवसेनेतील फुटीनंतर पहिली लिटमस टेस्ट अर्थात अंधेरी पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजपाकडून मुर्जीत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वास्तविक पाहता या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यात थेट सामना होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र शिंदे गटाने भाजपाला ती जागा दिली. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने जरी आपला उमेदवार मागे घेतला असला तरी माघारीनंतर भाजपाने आपले अस्तित्व दाखवून देत उध्दव ठाकरे गटाला चांगलाच फेस आणल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता शिवसेनेच्या फुटीमागे आणि उध्दव ठाकरे यांच्या पायउतार होण्यास भाजपाच असल्याचे एकप्रकारे स्पष्ट झाले. त्यानंतर शिवसैनिक उध्दव ठाकरे यांना सोडून गेलेला नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे जे गेले ते फक्त शिंदे यांचे समर्थकच गेल्याचे दिसून येत आहे. अंधेरी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मतदारांपर्यत पोहोचण्यात कमी पडल्याचे दिसून आले.
या निवडणूकीत फक्त ३१.७४ टक्के मतदारांनी अर्थात ८६ हजार १७६ मतदारांनीच मतदान हक्क पार पाडला. अंधेरीची एकूण लोकसंख्या २ लाख ७१ हजार ५०२ इतकी असून या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ३१ टक्के जनतेने आपली मते दिली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि डाव्यांची मते कुठे गेली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने अंधेरीतील मतदार मतदानासाठी बाहेरच पडला नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यातच शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारी पेक्षा नोटा मतांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. निवडणूकीच्या काळात भाजपाने मतदारांना नोटाचा वापर करा यासाठी मतदारांमध्ये पैसे वाटत असल्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर यासंदर्भातील तक्रार उध्दव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यावर या तिन्ही यंत्रणांकडून कोणतीही कारवाई केल्याची माहिती अद्याप तरी पुढे आली नाही.
या साऱ्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयासाठी नेमके काय केले?, त्यांच्यासाठी वेगळी प्रचार राबविली का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कारण फक्त निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर जरी उध्दव ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना विजय मिळाला असला तरी इतर नागरीकांचाही त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असणे आणि मतदाराला मतदान केंद्रापर्यत आणण्यात शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमी पडल्याचे दिसून येत आहे.
भाजपाने निवडणूकीच्या सुरूवातीला मोठ्या जोशात मुरजी पटेल यांना उमेदवारी देत त्यांच्यासोबत मोठा लवाजमा नेत उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरतानाच भाजपा चांगली लढत देणार असल्याचे वातावरण निर्माण केले. परंतु प्रत्यक्षात भाजपाच्या उमेदवाराचाही विजय अनिश्चित आणि राजकीय तोटा अधिक असल्याचे दिसून आले. जर या निवडणूकीत भाजपाने आपला उमेदवार ठेवला असता तर या निवडणूकीतील प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जी प्रसिध्दी आणि सध्या असलेल्या सहानभूतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असती. पण भाजपाने चाणाक्षपणे या बाबींचे गणित वेळीच ओळखून आपला उमेदवार मागे घेतल्याचे दिसून येते.
मात्र जरी भाजपाने राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या आवाहनानुसार आपला उमेदवार मागे घेत सन्मानजनक माघार घेतली. त्यामुळे भाजपाची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशा आशयाची झाली. मात्र त्यानंतर भाजपाने ज्या काही पडद्या मागच्या हालचाली केल्या त्या पाहता उध्दव ठाकरे गटाला चांगलाच फेस आणल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकिय परिस्थितीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे यांना मिळणारी सहानभूती मोठ्या प्रमाणावर असल्याचे अनेक पध्दतीने दिसून आले तरी त्याचे मतदानात परिवर्तित झाले नसल्याचे आजच्या निवडणूकीतील नोटा आणि एकूण मतांच्या संख्येवरून अशी शक्यता सध्या तरी अजिबात होताना दिसत नसल्याचे निवडणूकीच्या निमित्ताने दिसून आले.
त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांना स्वत:ला बाह्या सारून मैदानात उतरावे लागेल. त्याचबरोबर जे सहानूभूतीदार आहेत. त्यांना मतदारांमध्ये परावर्तीत करावे लागेल. तरच उध्दव ठाकरे यांचा पुढील राजकिय प्रवास सोपा होणार आहे. अन्यथा उध्दव ठाकरे गटाला रोखण्यासाठी भाजपाकडून सर्वप्रकारची नीती अर्थात साम-दाम-दंड याबरोबरच कुटनीतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याचे त्या कुटनीतीशी सामना करण्यासाठी उध्दव ठाकरेनाही अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे अंधेरी पोट निवडणूकीत उध्दव ठाकरे गटाचा विजय झालेला असला तरी पुढील राजकिय मार्ग सोपा नव्हे तर खडतरच असल्याचे स्पष्ट होत आहे.
Marathi e-Batmya