Breaking News

भाजपाचा बृजभूषणला सल्ला विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या विरोधात टीका नको हरयाणा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दिला सल्ला

भाजपाने पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंह यांना ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हरयाणात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टीका करण्याचे टाळावे असा सल्लाही भाजपाच्या श्रेष्ठींनी दिली असल्याची माहिती पुढे आली.

ऑलिंम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी भाजपाचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत दिल्लीत आंदोलनही केले. मात्र नुकतेच विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरून बृजभूषण सरण सिंग यांनी ते आंदोलन काँग्रेस पुरस्कृत असल्याची टीका करत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यावर टीका केली. मात्र या टीकेमुळे हरयाणातील सत्ताधारी भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मितीस बळकटी मिळू शकते. त्या पार्श्वभूमीवर बृजभूषण सरण सिंग यांना भाजपाच्या श्रेष्ठींनी तोंड आवरण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बृजभूषण सरण सिंह म्हणाले होते की, विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि खेळाच्या बळावर ते प्रसिद्ध झाले पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांची नावे पुसली जातील.

विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटूंपैकी होते ज्यांनी गेल्या वर्षी बृजभूषण सरण सिंगच्या विरोधात अनेक तरुण ज्युनियर कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते.

बृजभूषण सरण सिंग पुढे म्हणाले की, विनेश आणि बजरंग विधानसभा निवडणूक जिंकू असा विचार करत असतील तर त्यांची चूक आहे. ते हरियाणातील विधानसभेची कोणतीही जागा लढवू शकतात, भाजपाचा एक छोटा उमेदवार त्यांचा पराभव करेल, असा इशाराही दिला.

विशेष म्हणजे बृजभूषण सरण सिंग यांच्या टीकेनंतर काँग्रेसने हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगाटला उमेदवारी जाहिर केली.

दरम्यान, बजरंग पुनिया यांची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ते निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.

६ सप्टेंबर रोजी, फोगट आणि पुनिया, ज्यांनी गेल्या वर्षी सिंग विरुद्ध कुस्तीपटूंच्या निषेधाचे नेतृत्व केले होते, त्यांनी “घाबरणार नाही किंवा मागे हटणार नाही” असे वचन देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कुस्तीपटूंचा विरोध हा भाजपाला लक्ष्य करण्याचा काँग्रेसचे ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *