मुंबईः प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज झाले. मात्र या निवडणूकीत राज्याच्या स्थानिक पातळीवरील जनतेचा कल दाखविणारी असून भाजपाच्या दोन आजी-माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या दोन नेत्यांना त्यांच्याच मुळ गावातच ग्रामपंचायतीतील पक्षाची सत्ता राखता आली नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा पराभव झालाय. हा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच भाजपासाठीही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मात्र पाटील यांनी हा पराभव म्हणजे आपला पराभव असल्याचा दावा फेटाळू लावला. एक खानपूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी पहिली प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी देत अगदी थोड्या मतांनी आम्ही खानापूरमध्ये पराभूत झाल्याचे म्हटले. खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नसून महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुळ गावीही त्यांच्या समर्थकांना पक्षाची सत्ता राखता आली नाही. दानवे यांच्या भोकरदनमधील गावातही शिवसेनेने मुसंडी मारली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपाच्या विरोधात मतप्रवाह गेल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती.
खानापूरमधील सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केली होती.
Marathi e-Batmya