मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ' जावे विनोदाच्या गावा' विशेष कार्यक्रम

जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात व्यक्त केला.

कार्यक्रमास व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्यावेळी प्रशासन चालविताना मराठीवर फारशी, अरबी या भाषांचे आक्रमण होते. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. मराठी भाषेचा अभिमान हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते.

महाराष्ट्राच्या विधान मंडळात चालत असलेले कामकाज राजकीय क्षेत्र साहित्य निर्मिती करणारे आहे. या कामकाजामधूनच अनेक चित्रपट, नाट्य यांच्या कथानकांना विषय मिळत असतात. मराठीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिला आहे. मराठी भाषा, आपल्या भाषेतील साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

तंत्रज्ञानसंशोधन मराठी भाषेतून झाले पाहिजे-विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल, पुढे न्यायचे असेल तर तंत्रज्ञान, संशोधने ही मराठी भाषेतूनच झाली पाहिजेत. तेव्हा मराठी ही ज्ञानभाषा होईल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मराठी भाषा ही देशातील अधिकृत २२ भाषांपैकी एक असून देशात १ हजार ६५२ बोलीभाषा आहेत. मराठी भाषिक लोकसंख्या ही देशात तिसऱ्या आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि पुढे नेण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात आला. मराठी भाषा समृद्ध करणे आणि पुढील पिढीपर्यंत टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही ते म्हणाले.

संकटातही जो विनोद शोधतो तो खरा मराठी माणूस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे. विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस आहे, अशा शब्दात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही मराठी भाषेतील विनोदाची दोन शिखरे आहेत. त्यांच्या कर्तुत्वाची उंची हिमालयाएवढी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. मराठीचा वापर सर्व क्षेत्रात व्यवहाराची भाषा म्हणून केला पाहिजे. मराठीच्या समृद्धीची पताका सातासमुद्रापार आपल्याला फडकवत ठेवायची आहे. मराठी भाषेने मागील काळात बरेचसे बदल आत्मसात केले आहेत.

उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरात विविध देशांमध्ये कार्यरत असलेले मराठी बांधव आपण एकत्र आणण्याचे काम केले आहे. अशा या समृद्ध मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा उपयोग करीत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री सुनिता पवार म्हणाल्या, लंडनमध्ये मराठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे केंद्र ठरणाऱ्या प्रस्तावित महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागील काळात पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात  आला आहे. मराठी भाषेच्या प्रचारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानही वाढवून देण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे समस्त मराठी जन आनंदित झाले आहेत. हा मराठी भाषेचा खूप मोठा गौरव आहे. मराठी भाषा ही अर्थाजनाची भाषा होण्यासाठी हा दर्जा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत मराठी साहित्याची महती विषद केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान ‘लोकसेवेचा लोकजागर’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मंत्री, राज्यमंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी केले. ‘जावे विनोदाच्या गावा’ कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जावे विनोदाच्या गावा‘ विशेष कार्यक्रम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमामध्ये विनोदी कविता, विडंबन गीत, मराठी गीत सादर करण्यात आले. गायक श्रीरंग भावे आणि गायिका अदिती प्रभुदेसाई यांनी गीत सादर केले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी पु. ल देशपांडे यांच्या विनोदी लेखाचे वाचन केले. ‘ जगी हा खास वेड्यांचा पसारा’ जयवंत दळवी लिखित लेखाचे वाचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले. मंगेश पाडगावकर लिखित कवितेचे केदार शिंदे यांनी वाचन केले. तसेच वि. दा करंदीकर लिखित ‘ साठीचा गजर’ कविता ऋषिकेश जोशी यांनी सादर केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या जीवनकार्यांवर आधारित व्याख्यान केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *