मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे), शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), -कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून गेल्या २ वर्षात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या २५ वर्षात चांगले काम असल्याचेही यावेळी सांगितले.

वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे

मुख्यमंत्री फडवणसी पुढे बोलताना म्हणाले की, परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करतात, तसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहे, वेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे. उत्कृष्टता केंद्र, ईन्क्यूबेशन केंद्र, स्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे, असेही नमूद केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन शिक्षण धोरण आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं ‘चक्र’ हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगितले

सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘चक्र’सारखे मॉडेल आणि हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर “आयआयएम” सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *