काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश जयश्री जाधव यांची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार होते. जयश्री जाधव यांचा पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्याना कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जयश्री जाधव यांच्यासह त्यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांनीही यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर उद्योग जगतातील प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्योग जगताचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याना नवीन जबाबदारी देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी जयश्री जाधव यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या येण्याने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम झाली असल्याचे मत व्यक्त केले. विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या त्या कोल्हापूरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहचवण्यासाठी त्या नक्की प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बचत गटांसाठी सुरू केलेल्या लखपती दीदी, ड्रोन दीदी यासारख्या योजना किंवा महिला विकासाच्या इतर योजना जयश्री जाधव यांच्या माध्यमातून महिला भगिनींपर्यंत पोहचवण्यासाठी नक्की पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला.

जयश्री जाधव यांनी यावेळी बोलताना, आम्ही मूळचे शिवसैनिकच होतो मात्र माझ्या पती चंद्रकांत जाधव हे नंतर काँग्रेसमध्ये गेले. गेली दोन वर्षे मला आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली होती, मात्र यावेळी पक्षाने ती संधी नाकारली. त्यामुळे आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले. यापुढे कोल्हापूरात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी काम करू असे सांगितले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर, शिवसेना उद्योग आघाडीचे अध्यक्ष उदय सावंत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *