काँग्रेस नेते स्व.राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव, दिलीप माने यांचा भाजपा मध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आदी उपस्थित होते.

यावेळी रविद्र चव्हाण म्हणाले की, प्रज्ञा सातव आणि दिलीप माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात चालू असलेल्या विकासाला हातभार लावण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाची बूज राखली जाईल. समस्यांची जाण असलेले उमदे व्यक्तिमत्व स्व. राजीव सातव आज आपल्यात नाहीत याबद्दल दु:ख व्यक्त करत राजीव सातव यांचा समाजकार्याचा वारसा त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव पुढे नेत आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राजकारणातील अतिशय सज्जन व्यक्तिमत्व असलेल्या स्व.राजीव सातव यांच्यासोबत वीस हून अधिक वर्षे प्रज्ञा सातव यांनी समाजकार्य केले आहे. विकसीत हिंगोली साठी त्या भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. स्व.राजीव सातव यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रज्ञा सातव म्हणाल्या की, स्व.राजीव सातव यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. राजीव यांच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या कार्यात साथ देण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे.

यावेळी दिलीप माने म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास आणि भाजपाची विचारसरणी यांनी प्रेरित होऊन माझ्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करत आहे. निष्ठेने काम करून भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करेन असेही ते म्हणाले

श्रीमती प्रज्ञा सातव यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये हिंगोली येथील काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष पंकज जाधव, खेर्डा गावचे सरपंच पंजाबराव गडदे, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव चव्हाण आदींचा समावेश आहे.

दिलीप माने यांच्याबरोबर भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरचे माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे, बाजार समितीचे संचालक प्रथमेश पाटील, माने बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने आदींचा समावेश आहे.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *