हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, लोकसभेप्रमाणे महागरपालिकेतही काँग्रेसला विजयी करा समाजवादी पार्टी, एमआयएम, एनसीपी, भाजपा, व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्ष सर्वांना साथ देणारा पक्ष आहे, विविधतेत एकता अबाधित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे तर दुसरीकडे भाजपाचे राजकारण मात्र तोडफोडीचे, जाती धर्मात भांडणे लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले, नगरपालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले, धुळ्यातून शोभाताई बच्छाव यांना लोकसभेत पाठवले आता धुळे महानगरपालिकेत काँग्रेसची एक हाती सत्ता द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ धुळ्यातील सभेत बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देश एक झाला, लाखो लोकांनी त्याग केला, बलिदान दिले त्यांचा वारसा काँग्रेसला आहे तर स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना भाजपांचे पूर्वज मात्र ब्रिटिशांबरोबर होते. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग नव्हता. जिन्ना यांच्या मुस्लीम लिगसोबत जनसंघाने युती करत उपमुख्यमंत्रीपद भोगले आहे. हा देश सर्वांचा आहे, कोणा एका वर्ग विशेषाचा नाही, ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यात काहीही योगदान नाही ते आज सत्तेत आहेत असेही सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही, सभ्यता, परंपरा व संसस्कृतीला फाशी देण्याचे काम केले आहे म्हणून मी त्यांना जल्लाद म्हटले आणि दिलेला शब्द त्यांना आठवत नाही म्हणून गजनी म्हटले. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग करायला लावू म्हणाले होते पण या सर्वांचा त्यांना विसर पडला. लाडकी बहिणीला २१०० रुपये देणार होते, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार होते पण यातील त्यांनी काहीच केले नाही. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात, असेही सपकाळ म्हणाले.

भाजपा, शिवसेना, सपा, एमआयएममधील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत धुळ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये सलग तीन वेळा निवडून आलेले समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी, परवेझ शेख, अजहर पठाण, एमआयएमचे गनी डॉलर, जुनेद पठाण, शिवसेनेचे प्रेम सोनार, भाजपाचे मुर्तुजा अन्सारी यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी खा. डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भाई नगराळे, राजाराम पानगव्हाणे, धुळे काँग्रेसचे अध्यक्ष साबीर शेख, जावेद फारुखी, धुळे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रविणबापू चौरे, डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली.

स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आ. मुजफ्फर हुसेन, एम. एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आज उद्घाटन, उमेद मार्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *