हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदी सरकारच्या काळात दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे काय झाले पंडित जवाहरलाल नेहरुंचे भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान, भाजपाकडून मात्र नेहरुंना व्हिलन ठरवण्याचा पयत्न

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार निर्मितीची जबाबदारी विसरले आहे. नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार १२ वर्षांत २४ कोटी रोजगार निर्माण होणे अपेक्षित होते पण नव्या रोजगारांची निर्मिती तर झालीच नाही उलट लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत, असा गंभीर आरोप करत मोदी सरकारच्या काळात शिक्षण व्यवस्था आणि रोजगार क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील वाशी येथे जवाहर बाल मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘बाल दिन’ कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर, नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरुचरण बच्छर, निला लिमये आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिक्षणाचा मुख्य उद्देश माणसाला सुजाण आणि विवेकी बनवणे हा आहे. देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, ही नेहरूंची शिकवण होती. आज सुशिक्षित समाजातही अंधश्रद्धा वाढत आहे हे चिंताजनक आहे. देशातील आजच्या परिस्थितीला फॅसिस्ट विचारसरणी जबाबदार असून भाजपा आणि रा. स्व. संघाला दूर सारण्याचे गरज आहे. पंडित नेहरु यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जगात एक राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पंडित नेहरु यांनी विकासाचा पाया घातला म्हणूनच आज भारत जगात ताठ मानेने उभा आहे. देशाच्या जडणघडणीतील पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान विसरता येणार नाही परंतु पंडित जवाहलाल नेहरु यांना आज नरेंद्र मोदी व भाजपा एक व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. जे काही वाईट होईल त्याला नेहरु जबाबदार असल्याचे भाजपाकडून सांगितले जात असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांचा फोन टॅपिंग..

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोन टॅप होत असल्याचा प्रकार नवीन नाही. पेगासेस या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यासह देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोबाईलवर मोदी सरकारकडून नजर ठेवण्यात येत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच भाजप नेत्यांचे फोनही टॅप केले जात आहेत. पेगासस प्रकरणातील पुरावे यापूर्वीच जगासमोर आले आहेत. एपस्टीन फाइल्समधून अत्यंत विकृत प्रकार उघड झाल्यानंतर परदेशातील अनेक व्यक्तींवर कारवाई झाली आहे तर अनेक उच्चपदस्थ व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत पण केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे एपस्टिन कनेक्शन उघड होऊनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी देण्यात आली आहे असे सपकाळ म्हणाले.

नेहरु जयंतीनिमित्त ‘भारतगाथा’ कार्यक्रम..

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नेहरु जयंती निमित्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित ‘भारतगाथा’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अलोक शर्मा, सुरेंद्र राजपूत, इतिहासाचे अभ्यासक सौरभ वाजपेयी, ऋषीकेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ललितमोहन मिश्रा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंडित जवाहलाल नेहरु यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू वक्त्यांनी उलगडून सांगितले तसेच भारताच्या जडणघडणीत नेहरुंचे योगदान यावर भाष्य केले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरु हे जागतिक किर्तीचे नेते होते. नेहरु यांनी कधीही कोणत्याही जागतिक शक्तीसमोर भारताची आन-बान-शान कमी होऊ दिली नाही. अमेरिका व रशिया या दोन शक्तीसमोरही ते झुकले नाहीत पण आजचे पंतप्रधान अमेरिकेसमोर झुकले आहेत. अमेरिका भारताला न विचारताच परस्पर निर्णय घेते, भारताच्या पंतप्रधानांचा अपमान करते पण आजचे पंतप्रधान त्यावर चकार शब्द बोलत नाहीत.

यावेळी अलोक शर्मा म्हणाले की, पंडित जवाहलाल नेहरु यांच्या नेतृत्वाशी नरेंद्र मोदी तुलना करत आहेत पण अशी तुलना होऊ शकत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच नेहरु यांनी पंचवार्षिक योजनांची आखणी केली होती. पंडित नेहरु नसते तर जम्मू काश्मीर भारताचा भाग राहिला नसता केवळ नेहरुंमुळेच जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. ३७० कलमावरूनही भाजपा दिशाभूल करत आहे. भारत-चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरु यांनी संसदेला सर्व माहिती दिली पण आजचे पंतप्रधान चीनचे नावही घेत नाहीत. जवाहरलाल नेहरु यांच्या उंचीचे नेतृत्व भारतात झाले नाही. भाजपा व नरेंद्र मोदी मात्र नेहरुंची बदनामी करत आहेत, असेही अलोक शर्मा म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नेहरु जयंती निमित्त ‘कविता स्पर्धा’..

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त टिळक भवन येथे कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

About Editor

Check Also

एमपीएससी परीक्षांतील गैरव्यवहार चौकशी; निवेदने सादर करण्यास २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात निवेदने सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *