उदय सामंत यांची माहिती, महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन; महाराष्ट्र एम्पोरियमच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील पारंपरिक उद्योग, महिला बचत गट, सूक्ष्म व लघुउद्योजक आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमातील उत्पादकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याबरोबरच राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख जगभर पोहोचविण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ४५ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन (भा.प्र.से.), सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आयुक्त तथा महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.), महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल (भा.प्र.से.), महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे (भा.प्र.से.) यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.

‘विकास और विरासत’ संकल्पनेतून महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

उदय सामंत म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या व्यापार मेळ्यासाठी ‘विकास और विरासत’ ही संकल्पना निश्चित केली आहे. महाराष्ट्र दालनातही याच संकल्पनेनुसार राज्याची पारंपरिक कला, संस्कृती आणि आधुनिक उद्योगक्षमता यांचा संगम साकारण्यात आला आहे.

या दालनात पैठणी, कोल्हापुरी चप्पल, विदर्भातील साड्या, विविध मसाले, खादी व ग्रामोद्योग उत्पादने यांसह महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे सुमारे ६० ते ६५ स्टॉल उभारण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.

यंदा व्यापार उलाढालीत दुप्पट ते तिप्पट वाढ होण्याची अपेक्षा

मागील वर्षीच्या व्यापार मेळ्यात महिला बचत गट, ओडीओपी उपक्रमातील उत्पादक आणि लघुउद्योजकांनी सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांची व्यापार उलाढाल केली होती. यंदा महाराष्ट्र दालनाला मिळणारा प्रतिसाद आणि उद्योजकांचा सहभाग लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट व्यापार उलाढाल होण्याची अपेक्षा डॉ. सामंत यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील अधिकाधिक उत्पादकांना या व्यासपीठाचा लाभ मिळावा, यासाठी भविष्यात स्टॉलची संख्या वाढविणे आणि आवश्यकता भासल्यास अतिरिक्त दालन उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियमसाठी ५ कोटींचा निधी

दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराष्ट्र एम्पोरियमच्या सुमारे ५ हजार चौरस फूट जागेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील महिला बचत गट, ओडीओपी उत्पादक, पारंपरिक कारागीर आणि लघुउद्योजकांच्या उत्पादनांचे कायमस्वरूपी प्रदर्शन व विक्रीसाठी सुसज्ज व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे आकर्षक स्टॉल, उत्पादनांचे प्रभावी सादरीकरण आणि विक्रीची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.

छोट्या उद्योजकांना मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील उद्योजक दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करीत आहेत. मात्र, त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ आणि योग्य विक्री व्यवस्था उपलब्ध होणे आवश्यक आहे.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासारख्या उपक्रमांतून उत्पादकांना ग्राहक, व्यापारी, वितरक आणि संभाव्य गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते. या माध्यमातून उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते, असे डॉ. सामंत यांनी नमूद केले.

“महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला देशाच्या आणि जगाच्या बाजारपेठेत स्थान मिळाले पाहिजे. महिला बचत गट, पारंपरिक कारागीर आणि छोट्या उद्योजकांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची उद्योगक्षमता आणि सांस्कृतिक परंपरा जगासमोर मांडण्यासाठी अशा व्यापार मेळ्यांचा निश्चितच उपयोग होईल,” असे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि स्थानिक उत्पादनांना व्यापक संधी मिळवून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदी सरकारच्या काळात दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे काय झाले पंडित जवाहरलाल नेहरुंचे भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान, भाजपाकडून मात्र नेहरुंना व्हिलन ठरवण्याचा पयत्न

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार निर्मितीची जबाबदारी विसरले आहे. नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *