लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो !

राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन काँग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धाराशिव व सोलापूरच्या दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रेदशाध्यक्ष  पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यासमोर सर्वबाजूंनी संकटं उभी आहेत पण भाजपाचे हे सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचतच नाही. शेतकरी विरोधी भाजपाला पावसाळी अधिवेशनात जाब विचारू. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे, तसेच लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. मोठ्या संघर्षानंतर, काँग्रेस विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आज देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान धोक्यात आहे. मणिपूर ५० दिवसांपासून पेटलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिकेत भाषणे देत आहेत. देशावरचे भाजपाचे हे संकट दूर झाले पाहिजे व स्वातंत्र्याचा सूर्य कायम राहिला पाहिजे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा ईडी, सीडी, सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील आजचे राजकीय चित्र अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी भाजपा मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे. परंतु काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेचीच इच्छा असून जनसमर्थन व आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने केंद्रात व राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल.

भाजपाच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीचे नाही

देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीवर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पोपट काहीही बोलला की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, त्यांचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचेही नाही. ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना जर लोकशाही मान्य असती तर नवीन संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असते असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *