मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचा महाविकास आघाडी वर घणाघात आपण जिंकलो तर लोकशाही... आणि हरलो तर मतचोरी हा दुटप्पीपणा - आमदार अमीत साटम

कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी ‘मतचोरीचा रडिचा डाव’ साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ’सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच विचलित होत नाही, असा घणाघात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केला.

आज लोकमान्य टिळक उद्यान, गिरगाव चौपाटी येथे महाविकास आघाडीच्या तथाकथित “सत्याचा मोर्चा”च्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि ढोंगी राजकारणाविरोधात भारतीय जनता पक्षाने ‘शांत’ पण ‘ठाम’ भूमिका घेतली.

यावेळी बोलताना आमदार अमीत साटम पुढे म्हणाले की, खोटे कथानक निर्माण करून लोकांना दिशाभूल करण्याचाही त्यांचा डाव असल्याचे यावेळी दिसून येत आहे. आज फॅशन स्ट्रीटवर अ’सत्याचा’ तमाशा आणि अ’सत्याचा’ फॅशन शो हा महाविकास आघाडीने जणू काही भाड्याने आणलेल्या मिमिक्री आर्टिस्टला घेऊन रचण्यात आला होता. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला होणारा पराभव हा दृष्टीपथात असून त्या पराभवानंतर देण्यात येणाऱ्या स्पष्टीकरणांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या मोर्च्याच्या माध्यमातून ‘महाबिघाडी’ च्या वतीने आज करण्यात आले, असेही आमदार अमीत साटम म्हणाले.

अमीत साटम पुढे म्हणाले की, हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान व अवमान आहे, कारण जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान करण्याचे काम या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावरूनच “आपण जिंकलो तर लोकशाही… आणि हरलो तर मतचोरी” अशा प्रकारची दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीची असल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.

या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, महाराष्ट्र प्रवक्ते नवनाथ बन, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शलाका ताई साळवी तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *