नाना पटोले यांची मागणी, शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत नाना पटोले पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरीविरोधी आहे, राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, दुसरे आमदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल देतो असे म्हणून अपमान करतात. नेते तर मग्रुरी करताच पण आता अधिकारीही मस्तवालपणा करु लागले आहेत. मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेला असता, पवार या शेतकरी बांधवाने त्यांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली असता या मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला “तुला गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी दिली. ही घटना संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला असल्याची भूमिकाही यावेळी मांडली.

नाना पटोले शेवटी म्हणाले की, शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, एकीकडे अस्मानी संकट, तर दुसरीकडे सुलतानी संकट आणि त्यात भर म्हणून प्रशासनातील काही मुजोर अधिकाऱ्यांची अरेरावी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. कृषीप्रधान भारत देशात जर शेतकऱ्यांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे? असा सवालही यावेळी सरकाराला केला.

About Editor

Check Also

अमित शाह म्हणाले, आता एकच शिवसेना राहिली… कोल्हापूर येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांना लगावला टोला

मागील काही दिवसांपासून भाजपाच्या मदतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *