राहुल कलाटे म्हणाले, होय मला अजित पवार, उध्दव ठाकरेंचा फोन होता… पिंपरी चिंचवडची निवडणूक आता तिरंगी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढविणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी आग्रही दावा करत राहुल कलाटे हे संभावित उमेदवार असतील असे संकेतही दिले. मात्र अखेर अजित पवार यांच्या आग्रहामुळे शिवसेने ही जागा राष्ट्रवादीला सोडली. तसेच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चेत उध्दव ठाकरे यांनी आपला पाठिंबा आघाडीच्या उमेदवाराला असल्याचे जाहिर करत शिवसेनेचे राहुल कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात फोन केला. कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कलाटे यांच्याशी चर्चाही केली. मात्र राहुल कलाटे हे आपल्या अपक्ष उमेदवारीबाबत आग्रही असल्याचे आज स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्याबाबत राहुल कलाटे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता म्हणाले, आपली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्तिगत फोन केल्याचे सांगत आपण त्यांची विनंती नाकारत अपक्ष उमेदवार म्हणून निवडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि विविध पक्षातील काही नेते ज्यांनी मला माघार घेण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटले त्यांच्याविषयी मी आदर व्यक्त करतो. परंतु, चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसती. त्यामुळेच चिंचवडच्या जनतेतून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेटा होता की, मी लढलं पाहिजे.

याच १ लाख १२ हजार जनतेचं शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं. त्यावेळी संपूर्ण देशात भाजपाची लाट होती. दिवंगत आमदारांचा या भागातील लोकांवर प्रचंड दबाव होता. महापालिका, राज्य आणि देशातही भाजपाची सत्ता होती, असं असतानाही इतक्या लोकांनी मला मतदान केलं. याच लोकांचा आज मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह होता, असेही स्पष्ट केले.

प्रत्येकाचं एकच मत होतं की, राहुल तू लढलं पाहिजे. तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचा आदर करणं मला क्रमप्राप्त होतं. ही लोकभावना आणि पाठिंबा याच्या बळावर मी निवडणुकीला सामोरं जात असल्याचे कलाटे यांनी सांगितले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *