राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा मुंबई युवक काँग्रेसकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गिग वर्कर्सना पेट्रोलचे वाटप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्यावरील जनमानसाची ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व शिदोरीचे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे आदी उपस्थित होते.

राहुल गांधींचा वाढदिवस मुंबई युवक काँग्रेसनेही उत्साहात साजरा केला, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई उत्तर मध्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत अॅप- आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात आले.

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शिक्षणाला प्रोत्साहन देऊन, युवा पिढीला सक्षम करून आणि समाजसेवेप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राहुल गांधी हे देशाचे भविष्य आहेत. जनता त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे. मागील १२ वर्षात भाजपा सरकारने जनतेची घोर फसवणूक केली असून समाजातील एकही घटक या सरकारच्या कामावर समाधानी नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. गरिब अधिक गरिब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधले आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. भाजपा सरकारला जनता कंटाळली असून यातून राहुल गांधी यांचे नेतृत्वच देशाला तारू शकेल, असा विश्वास आहे. आज राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना पंतप्रधानपदावर बसवणे हाच काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प आहे”, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ

राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *