विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आज महायुतीतर्फे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्या विरोधात भाजपाकडून राम शिंदे यांना दोन वेळा उतरविण्यात आले. मात्र राम शिंदे यांचा दोन्हीवेळा पराभव झाला. त्यामुळे दोन टर्मपासून राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. राम शिंदे यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी यापूर्वीच भाजपाने नाव अंतिम करण्यात आले होते. मात्र उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांना पूर्ण संधी मिळावी आणि त्यांच्या कार्यकालात काही कार्यक्रम पूर्ण करता यावे यासाठी राम शिंदे यांची सभापती पदासाठी निवड करण्यात आली नव्हती.
विधान परिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली एकमताने निवड केली हे आपले भाग्य आहे. यावेळी दरेकर यांनी ‘उपसभापती होत्या नीलम गोऱ्हे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे… विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम!!’, अशीही कविता यावेळी केली.
प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, तसेच ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना कधी वाटले नव्हते की उपमुख्यमंत्री होईन. त्यांना सर्वतोपारी राज्याचे हित महत्वाचे आहे, कोण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राचे हित जपायचेय ही चांगली भावना महाराष्ट्राच्या संस्कृतीत होताना दिसतेय. श्रद्धा सबुरी हा साईबाबांचा मंत्र सर्वांनाच आचरणात आणण्याची सवय लागलीय. श्रद्धा सबुरी एवढा चांगला जीवनातील कोणता मंत्र नाही आणि राम शिंदे यांनाही साईबाबांचा श्रद्धा सबुरी हा मंत्रच कामी आला, असेही यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ-अंबादास दानवे
महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवोनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहात. आज तुम्ही या सर्वोच्च पदी बसल्याचा सर्वात जास्त आनंद तुमच्या माऊलीला होत असेल असे म्हणत दानवे यांनी शिंदे यांच्या सभागृहात बसलेल्या आईच स्वागत केलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच जलयुक्त शिवार योजनेत मंत्री झाल्यावर केलेल्या कामाचं कौतुक केलं. आपल्या कामात आमचं पूर्ण सहकार्य राहील. सभागृहात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांवर जास्त लक्ष ठेवा अशी विनंती करत आपल्या राजकीय जीवनात जरी संघर्ष राहिला असला तरी विरोधी पक्ष राज्याच्या हितासाठी संघर्षाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेईल, असे आश्वासन यावेळी दिले.
Marathi e-Batmya