रामदास आठवले यांचा टोला, झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून आठवलेंनी लगावला टोला

देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला. राणे यांच्या भूमिकेशी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही असहमती दर्शवत म्हणाले की, मटण झटका असो वा हलाल आपल्याला खायला मिळालं पाहिजे, असा उपरोधिक टोला नितेश राणे यांना लगावला.

नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटण विक्रीचा मुद्दा मांडला आहे, यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर देताना म्हणाले की, मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्याने करा. पण नितेश राणे एवढी हार्ड भूमिका घेऊ नका, असा खोचक सल्लाही यावेळी दिला.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत. सर्वधर्मसमभावाचे देशात संविधान निर्माण झाले आहे, त्याचा विचार करता मी नितेश राणे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचेही यावेळी सांगितले.

लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत खरंतर त्यांना मंत्री करायला हवं होते. पण आता एकच मंत्रिपद राहिले असल्याने दलितांच्या मतांचा विचार करता महायुतीच्या राज्य सरकार मध्ये आमच्या पक्षाचा मंत्री करा, अशी मागणी केल्याचेही यावेळी सांगितले.

शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा असं सांगितले आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे. तसेच मी देखील माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की, आता जय भीम आणि जय भारत म्हणा’ असेही यावेळी सांगितले.

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, ‘प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे वाद निर्माण होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे. त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुस्लिम होते, असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुस्लिम हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *