कामाला महत्त्व देणारी, संकटात साथ देणारी आणि आपत्तीत मदत करणारी ही खरी शिवसेना आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता या निवडणुकीत नक्की देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे येथील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात कल्याण डोंबिवलीमधील भाजपाचे तीन नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी महापालिकेचे नगरसेवक विकास म्हात्रे, त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे, उभाटाचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे, नंदू धुळे, दिलखुश माळी, कैलास शेलार, विक्रम माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री असताना आम्ही लोकाभिमुख व कल्याणकारी योजना राबवल्या. बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आणि विकासाला चालना दिली. त्यात ‘लाडकी बहीण’ योजना ही महत्त्वाची योजना असून ती कधीही बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून पाठिंबा दिला, त्यामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळातील सरकार हे ‘स्थगिती सरकार’ होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सर्व अडथळे दूर करून विकासाचे स्पीड ब्रेकर हटवले. सण-उत्सवांवरील निर्बंध काढून टाकले आणि लोकांच्या जीवनात आनंद परत आणल्याचेही यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “कल्याण-डोंबिवलीचा कायापालट खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. बहुतांश रस्ते काँक्रीट झाले आहेत, हजारो कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला गेला आहे. मेट्रोचे कामही जलद गतीने सुरू असून क्लस्टर योजनेतून नागरिकांच्या घरांचे स्वप्न लवकरच साकार होईल.”
शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवसेना हे कुटुंब आहे. येथे कोणी मालक-नोकर नाही; जो काम करेल, तो पुढे जाईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांनी दिलेला शब्द पाळणे हेच आमचे ब्रीद आहे. जनतेच्या सुख-दुःखात शिवसेना आणि मी स्वतः नेहमी उभा राहीन,” असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya