आदिवासी शेतकरी-शेतमजुरांचे ३६१ कोटींचे खावटी कर्ज माफ होणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले २४४.६० कोटींचे कर्ज आणि त्यावरील ११६.५७ कोटींचे व्याज अशा एकूण ३६१ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर हे अत्यंत दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे जुने कर्ज माफ झाल्याने आता त्यांना नवीन कर्जाचा लाभ घेता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत खावटी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांचे खावटी कर्ज माफ करण्याबाबत चर्चा झाली. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अल्पभूधारक व शेतमजूर यांना पावसाळ्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक अडचणीमुळे त्यांची उपासमार होऊ नये यासाठी खावटी कर्ज देण्यात येते. आदिवासी विकास महामंडळाने २००९ ते २०१४ या कालावधीत २४४ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. या कर्जासह त्यावरील ११६ कोटी ५७ लाख रुपयांचे व्याज थकित आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ९४० कोटी इतकी तरतूद उपलब्ध आहे. या तरतुदीतून ३६१ कोटी १७ लाख इतकी रक्कम खावटी कर्ज माफीचा खर्च भागविण्यास आदिवासी विकास महामंडळास कर्जाची परतफेड म्हणून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *