विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विवांता हॉटेल्समध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी रेड हॅण्डेड पकडले. त्यानंतर ठाकूर पिता पुत्र आणि विनोद तावडे यांच्यात शाब्दीक बाचाबाचीही झाली. यावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटण्यासाठी पाच कोटीच्या रकमेसह आल्याचा आरोप केला. तसेच यावेळी विनोद तावडे यांच्या जवळून पाच कोटी रूपयांची बॅग आणि नावे असलेली डायरीही हस्तगत केली. त्यावरून आता विरोधकांकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप आणि टीका करण्यात येत आहे.
यासंदर्भात जवळपास तीन ते चार तास गोंधळ सुरु होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता भाजपा आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा भाजपाचा नोट जिहाद आहे का असा उपरोधिक सवाल करत बाटेंगे और जितेंगे असा नारा भाजपाचा असल्याची टीका केली.
या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पैसे वाटतानाचा व्हिडिओ कोणी पाहिलं पाहिजे असा सवाल करत निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे. काल माजी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर आज पैसे वाटतानाचे काही व्हिडिओ समोर आले. त्यामुळे जादूचे पैसे कोठून आले असा सवाल करत कोणाच्या खिशात जात होते, आता देखील माझी बॅग तपासण्यात आली. मग त्यांच्या गॅगांची तपासणी कोण करणार असा सवाल करत निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे अन्यथा निवडणूक आयोगावरच कारवाई करण्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग शोधावा लागेल असा गर्भित इशाराही दिला. फक्त गुन्हा दाखल होऊन आरोपी फरार झाले नाहीत पाहिजे. मला अशी माहिती मिळाली की, काल नाशिकमध्ये पैसे वाटताना काही जण फरार झाले. पण निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विनोद तावडे जर तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत सरकारं कशी पाडली असतील कशी बनवली असतील याचा हा पुरावा आहे. महाराष्ट्राने हे पाहिले पाहिजे की त्यांच्या योजना कशा फसव्या आहेत हे जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पहात आहे. भाजपाचा हा नोट जिहाद आहे. बाटेंगे और जितेंगे असं काहीतरी या छडा लागला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya