पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पुतणे तथा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि कोलकातामधील कालीघाटात काली पूजेच्या उत्सवात निर्माण केलेल्या अडथळ्यांवरून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुमच्याकडे किती बुलडोझर आहेत? या, मी तुमच्यासमोर उभी आहे. माझ्या शरीरावर, माझ्या छातीवर बुलडोझर चालवा. तुम्ही किती शूर आहात, हे मला पाहायचे आहे असे सांगत भाजपाला आव्हान देत टीका केली.
ही घटना घडण्यापूर्वी, अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) समर्थकांशी झालेल्या संघर्षानंतर, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भाजपापुरस्कृत गुंडांनी कालीघाट रोडवरील त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यांनी या घटनेचे वर्णन जीवघेणा हल्ला असा केला आहे.
Watch this shocking footage of a BJP goon brazenly slapping a police officer in plain clothes. This is the BJP’s model of governance in West Bengal, where hooliganism rules and even police officers are not spared.
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) November 7, 2026
डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले, “दोन दिवस सतत रेकी (पाहणी) केल्यानंतर, आज पहाटे २ वाजता भाजपाच्या गुंडांनी माझ्या घरावर हल्ला केला. फुटेज पहा आणि स्वतःच खात्री करा. जर एका निवडून आलेल्या खासदारासोबत असे घडू शकते, तर पश्चिम बंगालमधील सामान्य माणसाची काय अवस्था असेल, याचा विचार करा! गेल्या सहा महिन्यांत माझ्यावर झालेला हा सातवा जीवघेणा प्रयत्न आहे. तरीही, ना कोणतीही पोलीस कारवाई झाली, ना कोणतीही न्यायालयीन हस्तक्षेप झाला असेही नमूद केले.
ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, या परिसरातील पारंपरिक काली पूजेच्या उत्सवात अडथळे आणले जात आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काही पूजांची परवानगी रद्द करण्यात आली आहे, तर मुख्य रस्त्यावर नव्याने आयोजित केलेल्या एका पूजेला परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा परिसर काली पूजेच्या मिरवणुकांचा पारंपरिक मार्ग आहे. मग काली पूजा आणि दिवाळीच्या तोंडावर उत्सवांमध्ये अडथळे का आणले जात आहेत, असा सवाल केला.
ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, स्थानिक क्लबना त्यांच्या उपक्रमांपासून रोखले जात आहे आणि भाजपा गुंडगिरीचा वापर करून परिसरात अशांतता निर्माण करत आहे.
ममता बॅनर्जी यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, जी पूजा पारंपरिकरित्या एका आवारात आयोजित केली जात असे, ती आता मुख्य रस्त्यावर का आयोजित केली जात आहे? त्यांनी दावा केला की, या बदलामुळे त्यांच्या स्वतःच्या उत्सवाच्या ठिकाणी जाण्याचा मार्गही बंद झाला आहे.
माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपाला पुन्हा एकदा आव्हान दिले. बुलडोझरच्या वापराच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, अशा प्रकारच्या कृती सुरू राहू देण्यापेक्षा, त्या स्वतःच या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत.
Marathi e-Batmya