अजित पवार यांची मागणी, सत्य येणे आवश्यक; निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश द्या राज्यपाल रमेश बैस यांना पत्र ;सरकारचे प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्या...

खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

यावेळी अजित पवार यांनी पत्रात म्हटले की, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने १४ अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर समाजमाध्यमातून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे. या सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनुयायी सात तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते. गर्दीचे नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोचण्यास विलंब झाला. राज्यात उष्णतेची लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. असा भव्य कार्यक्रम करण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीला काम देण्यात आले. या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यू झाला आहे. अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्याने उघडकीस येत आहेत. या सर्व बाबींची शहानिशा करून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे असे मतही व्यक्त केले.

तसेच अजित पवार म्हणाले, या कार्यक्रमाला तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उष्णतेची लाट लक्षात घेता सर्व शक्यतांची पडताळणी सरकारकडून होण्याची आवश्यकता होती. तथापि ती न झाल्याने १४ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे. सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. अनुयायांवर मोफत उपचार करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करावी. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही अशी नाराजीही अजित पवार यांनी पत्रात नमूद केली आहे.

दरम्यान सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंतीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.

About Editor

Check Also

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी, नव्या संस्थेची स्थापना विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना

जगभरातील विविध  देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *