Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. तसेच शाळांमध्ये ‘सखी सावित्री समित्या’ स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थिनींना संशय आल्यास संबंधित व्यक्तीस न घाबरता तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा हवी. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी चर्चा करून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.

Check Also

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेः मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *