छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवत असून त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या स्मारकांचा विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून या प्रेरणा स्थळांचा प्राधान्याने विकास करायला हवा. त्यामुळे नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा आपण तयार केलेला आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी नायगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळाचे स्मारक द्विशताब्दी वर्ष लागू होण्यापूर्वी पूर्ण करू अशी ग्वाही देत श्री क्षेत्र अरणचा विकास आराखडा लवकरच मंजूर करू असे आश्वासनग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव सातारा येथे अभिवादन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील, अतूल भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मदन भोसले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे एमडी राजेश खवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे, बापु भुजबळ, दिलिप खैरे, ॲड. सुभाष राऊत, समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, प्रा.दिवाकर गमे, ईश्वर बाळबुद्धे, उपसरपंच गणेश नेवसे, माजी सरपंच साधना नेवसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नायगाव येथील सावित्रीबाई स्मारकाच्या कामात प्रा. हरी नरके यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी या ठिकाणी मला आणले. त्यानंतर सर्वाधिक निधी या ठिकाणी खर्च करून या स्मारकाचा विकास केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवत असून त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या स्मारकांचा विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याची भूमिका मांडत सावित्रीबाई फुले यांचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे नेत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्यात आले. तरुणांच्या सबलीकरणासाठी महाज्योतीसाठी ४५३ कोटी निधीची भरीव तरतुद, केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला संविधनाचा दर्जा दिला, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच ओबिसींसाठी मंत्रालय स्थापन केले. भारतातील सर्वात मोठ्या पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक मार्गी लागले. भिडेवाडा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी ५० कोटी निधीची तरतुद महायुती सरकारकडून करण्यात आली. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्ताराचा प्रश्न देखील मार्गी लागत आहे. या स्मारकाच्या विस्तारासाठी २०० कोटी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. या स्मारकाबाबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही यावेळी केली.
छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे आद्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज यांचे गाव आरणला ‘अ’ वर्ग तीर्थस्थळ दर्जा देण्याची मुख्यमंत्री फडणवीस घोषणा केलेली आहे. त्याचा शासन निर्णय लवकर निर्गमित व्हावा. येथील मूलभूत सोईसुविधांसाठी व भक्त निवासासाठी १४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा लवकर मंजूर केला जावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा नावाने दिलेला पुरस्कार बंद झाला आहे. तो पुन्हा सुरु करण्यात येऊन ३ जानेवारी रोजी नायगावच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जावा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाड्मय अनेक दिवसापासून छापण्यात आलेले नाही. ते साहित्य छापण्यात यावे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगांव या राष्ट्रीय स्मारकात पर्यटन निवास केंद्र विकसित करण्यात यावे. तसेच २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरु करण्यासाठी जागा देऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच नायगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा आपण तयार केलेला आहे त्याला मंजुरी द्यावी अशा मागण्याही यावेळी केल्या.
Marathi e-Batmya