मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता शरद पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर देत म्हणाले की, नैतिकता आणि त्यांचा काही संबध आहे असा प्रतिप्रश्न करत अजित पवार गटाला फटकारले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, वास्तविक पाहता एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले तर संबधित मंत्र्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा देणे हि नैतिकता आहे. मात्र ज्यांच्यावर अनेक आरोप होऊनही राजीनामा देत नाहीत. मस्साजोग वासियांच्या भावना ज्याला कळतील तो त्या पदावर कधीही राहु शकत नाही. त्यामुळे त्यांचा आणि नैतिकतेचा संबध असेल असे काही वाटत नाही असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
राज्य सरकारमधील विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु आहे त्याबाबत आपली प्रतिक्रिया काय असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, त्यांच्या सरकारचे काम कसे चालते आणि कसे चालावे यासंदर्भात त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही विरोधात असल्याने आम्ही त्यावर सूचना करणार असेही यावेळी सांगितले.
तसेच त्यासंदर्भात जर तुम्हा लोकांकडे काही माहिती असेल तर ती माहिती आम्हाला पुरवावी त्याचा कसा वापर करायचा याचे कौशल्य आमचे असे आवाहनही यावेळी शरद पवार यांनी केले.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, महादजी शिंदे पुरस्कार हा काही पहिल्यांदाच दिलेला नाही. त्यापूर्वीही अनेकांना देण्यात आला आहे. तसेच त्या दिवशी एकनाथ शिंदे यांना दिल्याचीच चर्चा झाली. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आणखी १७ जणांना हा पुरस्कार देण्यात आला त्याचा उल्लेखच कुठे झाला नाही असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya