पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणेसह महाराष्ट्र हादरले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकिय वर्तुळातून उमटत असून पुणे पोलिस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेवरून काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना – पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस! असल्याची टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत ही टीका केली.
विजय वडेट्टीवार पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे आपल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे ट्विटमधून सांगत पुणे पोलिसांवर टीका केली.
शेवटी आपल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत? अशी प्रश्नांची सरबतीही यावेळी केली.
स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना – पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस!
स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
याहून धक्कादायक बाब म्हणजे…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 26, 2025
Marathi e-Batmya