मुंबईः प्रतिनिधी
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.
वांद्रे येथील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे, अर्जुन खोतकर, भाजपच्या पंकजा मुंडे यांची बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
भाजप-शिवसेनेत युती झाल्यानंतर विभागनिहाय समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली. मराठवाड्याची जबाबदारी भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे खोतकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात दानवे-खोतकर वादावर तोडगा काढण्याच्या कामी पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी दानवेंच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुख ठाम भूमिका घेत नसल्याने खोतकर यांच्याकडून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेवून चाचपणी केली.
मात्र यासंदर्भात उद्या रविवारी औरंगाबादेत युतीचा पहिला मेळावा होणार आहे. त्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार असून या बैठकीत दानवेंच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
मात्र माझ्याकडून मैत्रीपूर्ण लढतीच्या दिलेल्या प्रस्तावावरच आपण ठाम असून या लढतीत शिवसेना विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya