औरंगाबादहून पुण्यात आलेल्या महिलेला मदत केल्याच्या कारणावरून मदत करणाऱ्या महिलांच्या विरोधात पोलिस वर्दीचा गैरवापर करत पुण्यातील कोथरूडमधील पोलिसांनी वॉरंटशिवाय त्या महिलांच्या घरी जाऊन ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेलं. तसेच त्यांची एफआयआरही नोंदवून घेतली नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिस उपायुक्तांना फोन करून गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटवर म्हणाले की, औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली. या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेल्याचे सांगितले.
कायदा म्हणजे कायदाच असतो!
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.
या महिलेच्या… pic.twitter.com/dZjECvk0ns— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 3, 2025
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुणे पोलिस त्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली. मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगत, कायदा म्हणजे कायदाच असतो असा सूचक इशारा दिला.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला की, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
Marathi e-Batmya