पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस शोक संदेशात म्हणतात, डॉ माधव गाडगीळ यांनी पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. डॉ गाडगीळ यांच्या योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना २०२४ मध्ये यूएनईपीच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. मात्र त्यांनी स्वत:ला ‘जनतेचा वैज्ञानिक’ च मानलं. पर्यावरण क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र सुपुत्र डॉ. गाडगीळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. या अर्थाने त्यांची पर्यावरण जतन, संवर्धन क्षेत्राला उणीव भासत राहील. त्यांच्या निधनामुळे एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला आपण मुकलो असून गाडगीळ कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्यासह गाडगीळ यांचे चाहते, त्यांचे संशोधक विद्यार्थी यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हटले आहे.
पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, याचा वस्तूपाठ डॉ. गाडगीळ यांनी घालून दिला होता. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असे त्यांचे म्हणणे होते. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पर्यावरण संरक्षणात लोकांचा सहभाग घेण्यात त्यांना यश मिळाले. निसर्ग वाचवायचा असेल तर तिथल्या स्थानिक माणसाला सोबत घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. जल, जंगल आणि जमीन यावर स्थानिक लोकांचा अधिकार असावा, असे ते मानत. खाणकाम, मोठी बांधकामे आणि जलवायू बदल यासारख्या धोक्यांविरुद्ध लढणारा एक प्रमुख आवाज हरवला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Marathi e-Batmya