मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली.
या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ रोजी राज्य निवडणूक आयुक्तांना “Final Reminder” स्वरूपाचे सविस्तर पत्र पाठवण्यात आले असून, त्यामध्ये तक्रारीतील मुद्दे, सादर केलेले व्हिडीओ पुरावे आणि कायदेशीर बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. सदर तक्रार व त्यासोबतच्या पुराव्यांची प्राथमिक छाननी करून राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवले आहे. या संदर्भात आयोगाने MCGM अधिकाऱ्यांना अधिकृत ई-मेलद्वारे कळवले असून, त्या ई-मेलची प्रत तक्रारदारालाही पाठवण्यात आली आहे.
तक्रारीत खालील गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे:
* निवडणूक काळात *सार्वजनिक वाहतूक (मुंबई मेट्रो) व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर
* शासकीय यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराचा प्रश्न
* वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह असमान सुरक्षा बंदोबस्त
* आणि माध्यमांच्या उपस्थितीत प्रचारात्मक स्वरूपाची मुलाखत.
हे सर्व मुद्दे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, समान संधी आणि लोकशाही मूल्यांशी थेट संबंधित आहेत.
सदर प्रकरण सध्या सक्षम प्राधिकरणाकडे विचाराधीन असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
Marathi e-Batmya