आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्यात यावी आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल भाईंदर- उत्तन येथील केशव सृष्टी येथे नेण्याबाबतचा प्रस्ताव २८ ऑगस्ट रोजीच्या स्थायी समिती बैठकीत आला आहे. या सहलीसाठी २ कोटी ४३ लाख रुपये पालिका मोजणार आहे. सदर प्रस्ताव रद्द करावा, असे आमदार रईस शेख यांनी पत्रात म्हटले आहे.

आमदार रईस शेख पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस ) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून केशव सृष्टी स्थापन झालेली संस्था आहे. येथे भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते. संघ ही भाजपची मातृसंस्था असून हिंदुराष्ट्र या संघटनेचे उद्दिष्ट आहे, जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, असा मुद्दा पत्रात उपस्थित केला.

पुढे पत्रात आमदार रईस शेख म्हणाले की, केशव सृष्टी सारख्या धार्मिक एकारलेपणा असलेल्या संस्थेमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांची सहल नेणे शिक्षणाचे भगवीकरण आहे. पालिका प्रशासन हे राज्यघटनेला जबाबदार आहे आणि भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक उद्दिष्ट असलेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करणे घटनाविरोधी आहे, असल्याची बाबही पत्रामध्ये अधोरेखीत केली.

शेवटी पत्रात रईस शेख म्हणाले की, अयोध्या येथील राम मंदिर प्रतिष्ठापणेवेळी जानेवारी २०२४ मध्ये महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची श्रीराम यांच्या चरित्रावर स्पर्धा ठेवली होती. तेव्हा विरोध झाला होता. महापालिकेवर सत्ता कोणत्याही पक्षाची असो, प्रशासनाला धार्मिक हेतूंसाठी काम करता येणार नाही. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला वारसा आहे, त्याला तडा जाऊ देऊ नये, अशी मागणीही पत्राच्या माध्यमातून केली.

About Editor

Check Also

अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, तरीही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जातेय

सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *