धाराशिव तालुक्यातील सुर्डी येथील एका शेतकऱ्याने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली. तसेच दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे ३ हजार ९०० रुपये आल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. शेतीतील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती या घटनेतून समोर आली.
दीड एकरासाठी २५ हजार खर्च; उत्पादन अवघे ६० किलो!
धाराशिवमधील सुर्डी येथील या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मशागत, पेरणी, बियाणे, खते, औषधांची फवारणी आणि काढणी अशा विविध कामांसाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे या क्षेत्रातून अवघे ६० किलो सोयाबीनचे उत्पादन मिळाले.
उत्पादनाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात केवळ ३ हजार ९०० रुपये आले. म्हणजेच शेतीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यंत कमी मिळाल्याने त्याला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.
उर्वरित १,५०० रुपये कर्जाऊ घेऊन मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर
शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांनाच पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोयाबीन विक्रीतून मिळालेले ३ हजार ९०० रुपयेच हातात असल्याने मनीऑर्डरसाठी आवश्यक असलेली उर्वरित १ हजार ५०० रुपयांची रक्कम त्याने गावातील एका व्यक्तीकडून कर्जाऊ घेतली. ती कर्जाऊ रक्कम आणि सोयाबीनच्या विक्रीतून मिळालेली ३ हजार ९०० रूपयांची रक्कम एकत्रित करत ५ हजाराची रक्कम मुख्यमंत्र्यांनाच मनी ऑर्डरने पाठवली.
दीड एकर सोयाबीनसाठी २५ हजार रुपयांचा खर्च करूनही उत्पन्न अवघे ३ हजार ९०० रुपये मिळत असतील, तर शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार कसे, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहे. दुष्काळी परिस्थिती, घटलेले उत्पादन आणि वाढता शेतीखर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर समाधान मानायचे कसे, असा सवाल उपस्थित करत सुर्डीतील शेतकऱ्याने मनीऑर्डरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. या कृतीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत शासनाची मदत किती तुटपुंजी आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.
दरम्यान, राज्य सरकारने या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाच हजार रूपयांची तुटपुंजी मदत करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजाराची मनी ऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव चांद शेख असे आहे.
Marathi e-Batmya