मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम

मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘ ५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या ‘ इज ऑफ लिविंग’ मध्ये कमालीची सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल, शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल तसेच गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरीपर्यंतचा उड्डाणपूल यांचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात पुणे येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, विद्याविहार येथील कार्यक्रमातून आमदार राजहंस सिंह, पराग शहा, महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरात उत्तर -दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अखंड संपर्कव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विद्याविहार, गोरेगाव पूर्व आणि शीव येथील तीनही पूल प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे असून, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल. पूर्व-पश्चिम संपर्कासाठी गोरेगाव मुलुंड जोडा रस्ता (जीएमएलआर) हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातील प्रवासासाठी यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. आता हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरील उड्डाणपुलाचा वाहतूक भारही कमी होण्यास मदत होईल.

गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि उन्नत गोलाकार रस्ता प्रकल्पाची रचना प्रभावी पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन तसेच लगतच्या चौकांतील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. पूर्व-पश्चिम संपर्कक्षमता वाढविण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. शीव रेल्वे स्थानकावरील जुना पूल ११२ वर्षांचा आणि असुरक्षित झाला होता. नवीन पूल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेणे शक्य करणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलची संख्या आणि वारंवारता वाढविता येईल व त्याचा प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन शीव पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी या पश्चिमेकडील भागांशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित करीत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या समन्वयातून अनेक मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. तिन्ही स्तरांवरील यंत्रणांच्या समन्वयामुळे ही कामे वेळेत पूर्ण होत आहे. या सुविधांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होत आहे. या कामगिरीबद्दल मनपा प्रशासन आणि अभियंते, कंत्राटदार, अधिकारी आणि कामगारांचे त्यांनी अभिनंदनही केले.

प्रास्ताविक मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपस्थित होते.

शीव रेल्वे पूल

हा ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ५ व्या व ६ व्या रेल्वे मार्गिकेच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली.यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल. शीव पूर्व आणि शीव पश्चिम भागांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे यांच्या सुलभ जोडणी. प्रकल्पाचा खर्च रेल्वे भाग: रु. ३३.५१ कोटी आणि पोहोच रस्ता रु. ३१.६२ कोटी. पुलाचे काम अंदाजे ४ महिने अगोदर काम पूर्ण करण्यात आले आहे.

रेल्वे पुलाची एकूण लांबी ५४.५ मीटर व रुंदी २६ मीटर (४९६ टन वजनाचे २ ‘सेमी थ्रू स्टील गर्डर’). पोहोच रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (६५ मी), धारावी (११० मी) आणि एल.बी.एस. रोडच्या दिशेने (९७ मी) लांबी. एल.बी.एस. मार्ग व संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.सॉलिड अप्रोच व जमिनीला मजबुती देण्यासाठी ‘टच पाईल्स’ चा वापर करण्यात आला आहे.

विद्याविहार उड्डाणपूल (पूर्व व पश्चिम जोडणारा)

विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले. घाटकोपर स्टेशनजवळील उड्डाण पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. पुलाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले आहे. टप्पा एक मध्ये रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना व ९९.३४ मी लांबीच्या दोन तुळ्यांची स्थापना करण्यात आली. तसेच टप्पा २ मध्ये पूर्व व पश्चिम बाजूच्या ५०० मी लांब सेवरस्त्यांचे बांधकाम पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून रुंदी १५.५० मीटर ते १७.५० मीटर आहे.
पूर्वेकडील आर. सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्ग यांमधील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांवरून अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील उड्डाणपूल

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जलद व सुरळीत वाहतूक सुविधा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज व जलद पोहोच, ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड आणि हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरातील प्रमुख वाहतूक कोंडी दूर होईल.

गोरेगाव पूर्व येथील रस्ता १.२६ किमी लांबीचा, सहा मार्गिकेचा उड्डाणपूल. पूर्वनिर्मित बॉक्स आकाराचे काँक्रीट सेगमेन्ट. उड्डाणपुलावर पी ७ ते पी ११ दरम्यान वक्राकार पोलादी स्पॅन आणि गुंतागुंतीची बहुदिशात्मक रचना. भूस्तराच्या स्थितीनुसार पाईल्स आणि ओपन फाऊंडेशनची सोय.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अंडरवर्ल्डच्या धमक्या व हल्यांमुळे बॉलिवूड प्रचंड दहशतीखाली, बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र साबरमतीच्या जेलमध्ये बसून गुंड चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील तर पोलीस यंत्रणा व भाजपा सरकार काय करते?

मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *