फळपिकांचा क्रॉपसॅप योजनेत समावेश करण्याचा निर्णय ४१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्याची कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाचे दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या चालू वर्षापासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) राबविण्यासाठी ४१ कोटी ४७लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकावरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने सन २००९-१० ते  २०१२-१३ दरम्यान राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून आणि सन २०१३-१४ पासून नियमित राज्य योजनेतून कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन क्रॉपसॅप योजनेच्या धर्तीवर आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख फळ पिकांसाठी सन २०११-१२ पासून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून हॉर्टसॅप प्रकल्प राबविण्यात येत आहे.

क्रॉपसॅप व हॉर्टसॅप प्रकल्पांची एकसमान कार्यपद्धती विचारात घेऊन दोन स्वतंत्र योजना न राबविता फळ पिकांचा क्रॉपसॅप योजनेमध्ये समावेश करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.  क्रॉपसॅप योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकल्पांतर्गत पिकांवरील कीड व रोगाचे विविध टप्प्यावर काटेकोरपणे व नियमितरित्या परिक्षण व त्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला प्राप्त करुन शेतकऱ्यांना कालमर्यादेत मार्गदर्शन करण्यासंदर्भात सुधारित सूचना करण्यात आल्या आहेत.

क्रॉपसॅप योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या प्रमुख पिकांसह आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख फळ पिकांचा समावेश राहील. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात यावी व त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेल्या मोबाईल ॲप्लिेकेशन व संगणक प्रणालीचा वापर करण्यात यावा. सदर योजनेकरिता विकसीत करण्यात आलेल्या संगण्क प्रणालीमध्ये कृषि सहायक व कृषि पर्यवेक्षक यांची स्काऊट म्हणून व मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी आणि जिल्हा कृषि अधिकारी यांची त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नोंदणी करण्यात यावी व त्यांना कीड व रोग सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.

योजनेच्या नियोजन व संनियंत्रणासाठी राज्य पातळीवर कृषि आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. क्रॉपसॅप योजनेंतर्गत पिकांवरील प्रमख कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मोबाईल ॲपद्वारे व एसएमएसद्वारे  शेतकऱ्यांना सल्ले देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

About Editor

Check Also

तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत २०२५–२६ या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीजकोष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *