‘राजी’साठी अमृताने पुन्हा गिरवले उर्दूचे धडे पाकिस्तानी शाही कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार

मुंबई : प्रतिनिधी

मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हिंदी सिनेमांमधील लहान-सहान भूमिकांमध्येही तिने रसिकांची दाद मिळवली आहे. सध्या ती धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘राजी’च्या ट्रेलर तसंच गाण्यांमध्येही अमृता दिसते. ‘राजी’मध्ये अमृता पाकिस्तानी शाही कुटुंबातील मुनिरा नावाच्या गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला या सिनेमामध्ये उर्दू भाषेतील संवाद होते. यापूर्वी ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता ‘राजी’मध्ये मुस्लिम भूमिकेत ती दिसणार आहे. ‘कट्यार..’नंतर हा सिनेमा करताना पुन्हा एकदा अमृताने उर्दूच्या शिकवण्या घेतल्या. याविषयी ती म्हणाली की, ‘कट्यार काळजात घुसली’पेक्षाही ‘राजी’मधील उर्दू जास्त कठीण होतं. त्यात मशहूर गीतकार-शायर गुलजार यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघना गुलजार यांनी आपल्या तयारीचं कौतुक केल्याचं अमृता म्हणाली.

याचा फायदा अमृताला सिनेमाच्या ऑडिशनच्या वेळी झाला. याबाबत ती म्हणाली की, मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून मेघना गुलजार खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच ऑडिशन झाल्या-झाल्या लगेचच मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केलं. सिनेमाचं शुटिंग सुरू झाल्यावर काही सीन्समध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघना गुलजार यांनी आपली पाठही थोपटल्याचं अमृताने सांगितलं.

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *