जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त ‘भारतभाग्यविधाता’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन नेहरूंचे राष्ट्रउभारणीतील योगदान, विचार आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीचा होणार जागर

भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारतभाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत टिळक भवन, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रउभारणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका, औद्योगिक व आर्थिक विकासाची त्यांची दूरदृष्टी, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीसाठी उभारलेली पायाभूत व्यवस्था तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असलेली त्यांची अढळ निष्ठा या महत्त्वपूर्ण पैलूंवर या कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे. नेहरूंच्या विचारांची आजच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीशी सांगड घालून त्यांच्या योगदानाचे महत्त्व नव्या पिढीसमोर मांडण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत तसेच माजी खासदार कुमार केतकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नाटक व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कवी व सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांच्यासह कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडित नेहरू यांच्या विचारांवरील पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पोस्टर प्रदर्शन, विशेष प्रश्नमंजुषा, ‘भारत एक खोज’मधील निवडक भागांचे अभिवाचन आणि विशेष नाट्यसादरीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी घातलेला भक्कम पाया, त्यांनी रुजवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता व सामाजिक एकात्मतेची मूल्ये आजही देशासाठी मार्गदर्शक आहेत. सध्याच्या काळात संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाहीची बळकटी आणि सामाजिक एकात्मतेची जपणूक करण्यासाठी नेहरूंच्या विचारांचे स्मरण आणि प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेल व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, विचारवंत आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील
कार्यक्रम : ‘भारतभाग्यविधाता’
दिनांक : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ४.०० ते ६.३०
स्थळ : टिळक भवन, दादर, मुंबई

About Editor

Check Also

आशिष शेलार यांचे आश्वासन, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर राज्यातील ३०५ तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती

आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *