अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे, निराधार आरोप करत असतात. या कराराबाबतही ते फेक नरेटिव्ह पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत एका कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते.
पियुष गोयल पुढे बोलताना म्हणाले की, या व्यापार करारातील प्रत्येक निर्णय हा देश, शेतकरी, युवक आणि १४० कोटी भारतीयांच्या हितासाठीच घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांना ना भारतमातेची, ना देशातील शेतकरी आणि युवकांच्या कल्याणाची चिंता आहे. त्यामुळे देशाच्या समृद्ध भविष्यासाठी ते एखादी सकारात्मक भूमिका घेतील ही अपेक्षा करणेच चुकीचे ठरते, असे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत उपापययोजना केल्या आहेत, निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारच्या विविध योजना आणि ऐतिहासिक निर्णयांमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. भारत अमेरिका व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित जपण्यात आले असून, त्यांचे संपूर्ण संरक्षण करण्यात आले आहे. या करारामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, सोयाबिन, मका, सुधारित जनुकीय अन्न उत्पादने, मसाले आणि बटाटा यांसारख्या प्रमुख पिकांना वगळण्यात आले आहे. या करारामध्ये सफरचंदासह प्रमुख फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. दुग्धजन्य उत्पादने किंवा कुक्कुटपालन क्षेत्रासाठी भारताचे दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत, असेही यावेळी स्पष्ट केले.
पियुष गोयल म्हणाले की, भारतातील बासमती तांदूळ, फळे, मसाले, चहा, समुद्री उत्पादने आणि इतर अनेक कृषी उत्पादनांना या करारामुळे नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे निर्यात वाढेल, मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांच्याही उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. सूती वस्त्रांच्या निर्यातीसाठीही मोठी बाजारपेठ खुली करण्यात आली असून, त्यामुळे कापसाची मागणी अनेकपटीने वाढेल आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगितले.
पियुष गोयल शेवटी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी कितीही खोटे पसरवण्याचा किंवा देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध, शक्तिशाली, आत्मनिर्भर आणि विकसित भारत नक्की घडणार अशी ग्वाही दिली.
Marathi e-Batmya