मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
अनिल परब म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बिथरलेल्या भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाने आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत कुरघोड्या सुरु केल्या आहेत. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतही राजकीय हस्तक्षेप आणल्याचा आरोपही यावेळी केला. तसेच या संदर्भातील पुरावेच अनिल परब यांनी माध्यमांसमोर ठेवले.
अनिल परब यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख संतोष शिंदे हे सुध्दा उपस्थित होते.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण ती सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलीय का असा आरोप करतानाच, पदवीधर निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी घरोघर जाऊन नोंदवलेली अनेक मतदारांची नावे पुरवणी मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक समाविष्टच करण्यात आलेली नाहीत. शिवसैनिकांनी भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले आहेत असा आरोप ही यावेळी करत भाजपा आणि मिंधे गटाने नोंदवलेली सर्व नावे मतदार यादीमध्ये आल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले.
अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, मतदार अर्ज भरल्यानंतर तो तपासला जातो आणि पूर्ण असेल तरच स्वीकृत केला जातो. त्यानंतर पोच म्हणून स्लीप दिली जाते. रद्द केला गेला तर तिथल्या तिथे कारण सांगितले जाते. ऑनलाईन अर्ज भरला तरी तो परिपूर्ण असेल तरच तो स्वीकारला जातो. शिवसेनेने नोंदवलेल्या हजारो मतदारांना अशी पोच मिळूनही त्यांची नावे का गाळली गेली ते आम्हाला कळायलाच हवे अशी मागणी करत खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घ्यायला गेलो होतो. परंतु ते कार्यालयात नसल्याने तिथे उपस्थित सहमुख्य अधिकारी कुळकर्णी व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार दिल्याची माहितीही यावेळी दिली.
मतदार यादीत समाविष्ट न केलेल्या नावांची छाननी करून ती त्वरित मतदार यादीत सामील करावीत अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक पाच ते दहा अर्ज पाठवत होता. तीच नावे हेरून ती रद्द केली गेली आहेत असे सांगतानाच, शिवसेनेला मतदान होऊ नये म्हणूनही कारस्थान केले गेले. वांद्र्याला राहणाऱ्या मतदाराला विक्रोळी आणि मुलुंडला मतदान केंद्र देण्यात आले आहे. एकाच पत्त्यावर राहणाऱ्या पती-पत्नीचेही मतदान वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ही प्रक्रियेतील चूक आहे की जाणीवपूर्वक केले गेलेले कृत्य आहे याचा तपास व्हायला हवा अशी मागणी केली.
अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारीही शिवसेनेचे मतदार असल्याचे पाहूनच नियुक्त केले गेले असून त्यांच्या मतदानाची काय सोय केली हेसुध्दा निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे आणि त्यांना पोस्टल मतदानाची व्यवस्था करावी. मतदानासाठी खासगी आस्थापनांतील पदवीधर कर्मचाऱ्यांना दोन तासांची सुट्टी देण्याचे निर्देश जारी करावेत असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात मागणी करण्यात आली आहे.
Marathi e-Batmya