अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन यावेळी केले.

शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख करत या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन यावेळी केले.

मुंबईत साकारणार आयआयसीटी – माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की,  भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्त, पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले

About Editor

Check Also

कल्याणमध्ये मेगा ब्लॉकच्या दिवशी अज्ञात व्यक्तीची करामतः रेल्वे खांबावर चढल्याने करंट प्रकृती गंभीर, ऐन उन्हाच्या तडाख्यात अज्ञात इसमाचे कृत्य

कल्याण रेल्वे स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *