Breaking News

अश्विनी वैष्णव यांची माहिती, पुढील पाच वर्षांत मुंबईसाठी २५० नवीन लोकल ४१ नवीन प्रकल्प , ५८७७ किमीचे नवीन रेल्वे जाळे

वर्ष २०२४-२५ साठीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रुपये १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात राज्यात ४१ नवीन रेल्वे प्रकल्प, ५८७७ किमी चे नवीन रेल्वे जाळे, पुढील पाच वर्षांत २५० नवीन लोकल रेल्वे सेवा तर अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत १२८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यासर्व बाबींचा समावेश केला गेला आहे.

दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी राजधानीतून बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली. राज्याचे संबंधित अधिकारी व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना, माहिती देताना महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १५,९४० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीच्या सहाय्याने मुंबईला पुढील पाच वर्षात २५० नवीन लोकल ट्रेन सेवा मिळणार असल्याचे सांगत, मुंबईकरांचा प्रवास सोयीचा व सुलभ होईल तसेच या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रेल्वे सेवांचा विकास होईल आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख रेल्वे प्रकल्प

महाराष्ट्रात सध्या ८१,५८० कोटी रुपयांचे ५,८७७ किलोमीटर लांबीचे रेल्वे जाळे असलेले ४१ प्रकल्प सुरू आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातील १२८ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. राज्याने १००% रेल्वे विद्युतीकरण झाले आहे व दरवर्षी १८० किमी नवीन मार्गिका टाकल्या जात आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी लक्षणीय निधी राखून राज्यातील एकूण रेल्वे गुंतवणूक १.३ लाख कोटी रुपये असल्याचे वैष्णव यांनी यावेळी नमूद केले.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवांची वाढ

सध्या मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर १,८१९ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १,३९४ लोकल गाड्या धावत आहेत. याव्दारे अनुक्रमे ४० लाख आणि ३५ लाख प्रवाशी प्रवास करतात. मुंबई शहरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एम.यू.टी.पी.) कुर्ला आणि सी.एस.एम.टी. दरम्यानचे पाचवे आणि सहावे रेल्वे मार्ग स्थानिक तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार. पुढील पाच वर्षांत २५० नवीन लोकल गाड्यांच्या समावेशासह या प्रकल्पाचा उद्देश गर्दी दूर करणे आणि मुंबईकरांसाठी सुलभ प्रवासाची सोय करणे आहे, असे त्यांनी सांगितले.

नव्या मेल-एक्सप्रेस गाड्या व टर्मिनल्स

रेल्वे मंत्रालय मुंबईहून ५०-१०० नवीन मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आखत आहे असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड, परळ आणि ठाकूरली येथून आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोडजवळ नवीन टर्मिनस प्रस्तावित केले असल्याची त्यांनी माहिती दिली. या मेगा टर्मिनस प्रकल्पासाठी सुमारे ७.५ एकर जमीन संपादित केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबर मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 2ए, 3 आणि 3ए चा भाग म्हणून क्षमता वाढीचे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे सुरू आहेत. तसेच पुणे येथील खडकी, हडपसर, शिवाजी नगर आणि उरळी कांचन, यासारख्या स्थानकाची सुधारणा करुन यासारख्या विविध स्थानकांमध्ये पर्यायी कोचिंग टर्मिनसच्या विकासासाठी भविष्यातील नियोजनाचाही या चर्चेमध्ये समावेश होता.

रेल्वे सेवांच्या सुधारणा

केंद्रीय मंत्री यांनी विशेषत: मुंबई विभागातील प्रवाशांचा एकूण प्रवास सुलभ करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचीही माहिती यावेळी दिली. यामध्ये येत्या पाच वर्षात सुमारे २५० नवीन लोकल सेवांची भर पडेल, तसेच १०० मेल एक्सप्रेस गाड्यांचीही भर पडेल. यामुळे संपूर्ण राज्यात होणारा मल्टिपल मेगा टर्मिनलचा विकास, भविष्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमधील विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
मुंबईत धावणा-या लोकल गाड्यांमध्ये १८० सेकंद (३ मिनिटे) चे अंतर असते. यापुढे हे अंतर कमी करुन १८० सेकंद वरून १५० सेकंद (२.५ मिनिटे) पर्यंत कमी करण्यासाठीचे लक्ष्य आहे. या कपातीमुळे रेल्वे सेवांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मुंबईतील रहिवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *