Breaking News

मुंबईतील दोन उमेदवारांवर खर्च नोंदवही सादर न केल्यामुळे गुन्हे दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी ९ मे २०२४ रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांना सूचना देऊनही ते दुसऱ्या वेळेस उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून सुनील यादव (आयआरएस) यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) संजय यादव यांनी ९ मे, २०२४ रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवह्यांची प्रथम तपासणी केली. त्यावेळी २८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक खर्च प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्च लेखा तपासणीस खर्च नोंदवहीसह उपस्थित राहणे अपेक्षित होते.

तथापि, सदर तपासणीस नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील आणि संजय निवृत्ती पाटील, अपक्ष हे उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांच्या प्रतिनिधीनेही निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आले होते. मात्र हे दोन उमेदवार ९ रोजी उपस्थित न राहिल्याने, ११ मे, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुनश्च उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आली होती. तथापि, नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील, आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील यांनी स्वतः किंवा आपल्या खर्च प्रतिनिधीमार्फत निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) अन्वये निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वतः किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने, निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निकाल जाहीर झाल्याचा दिनांक हे दोन्ही दिवस धरून, होणाऱ्या कालावधीच्या दरम्यान उमेदवाराने किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने स्वतः केलेल्या किंवा त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार झालेल्या निवडणूक खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा विहित नमुन्यात ठेवणे बंधनकारक आहे.

तरी या दोन्ही उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) मधील तरतूदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी कळविले आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *