इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई विभागातील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी कळविले आहे.

मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक (दक्षिण/ उत्तर/ पश्चिम) मुंबई व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे/ रायगड/ पालघर यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत अवगत करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्य मंडळाच्या मुंबई विभागातील मान्यताप्राप्त सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी (सन २०२४-२५ मध्ये रजिस्ट्रेशन केले असले तरीही) आपल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची रजिस्ट्रेशन बाबतची सर्व माहिती https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर भरावी. जी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये सदर कालावधीत उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरणार नाहीत, अशा उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सन २०२५-२६ या वर्षामध्ये इयत्ता ११ वी मध्ये ऑनलाईन विद्यार्थी अलॉट होणार नाहीत व याची सर्व जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची राहील, असेही कळविण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या कार्यालयात स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या प्रवेश नियंत्रण कक्षामार्फत या कार्यालयात प्रत्यक्ष आलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जात असल्याचे या कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील इयत्ता १० वी च्या ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्यामार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व लिपीक यांचे वार्ड/ तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन मदतीसाठी हेल्प सेंटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना व मार्गदर्शन इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन सादर करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सदर सूचनांचे बारकाईने वाचन करूनच आपला प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *