मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईतील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे प्रतिपादन केले. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्त पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांच्या मजबूत आधारापासून ते सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाचा समन्वय, विश्वास आणि धैर्य या खेळाला यशस्वी करतात. घाटकोपरची दहीहंडी ही मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, येथे देशाच्या विविध भागांतून येणारी पथके सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक स्वरूपाचा न राहता व्यापक ओळख निर्माण करणारा सांस्कृतिक सोहळा झाला आहे, असे म्हणाले.

वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ

आज सकाळपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ केला. दहीहंडीतून निघालेले ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रदर्शित केले.

यानंतर वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशन आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. गोविंदा पथकांनी उंच थर रचताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी, गोविंदा पथके व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, वांद्र्यातील अपघात प्रकरणी कार चालक महिलेला कठोर शिक्षा करा वांद्र्यात कार अपघातात मृत्यू पावलेल्या अंश गुप्ताच्या आई वडिलांची वर्षा गायकवाड यांनी घेतली सांत्वनपर भेट

वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात  ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *