मराठी ई-बातम्या टीम
मुंबईसह महानगरातील कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पहिली ते नववी व अकरावी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन आणि माध्यमांच्या शाळा ४ जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सोमवारी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी हा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि मुंबई महापालिकेने शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु आता पुन्हा कोरोना आणि नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला.
देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते ९वी पर्यंतच्या शाळा व अकरावीचे वर्ग ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर १० वी आणि १२वीचे वर्ग सुरू राहाणार आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजीच पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेने शाळांबाबत अखेर हा निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा या सुरु राहणार आहेत. पालिका क्षेत्रातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील विदयार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण होणार असून यासाठी महापालिका शाळासह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असलेल्या विदयार्थ्यांना शाळेत बोलवता येईल असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.
Marathi e-Batmya