दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार नायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश

समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले.

त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दुपारी ३ वाजता गंभीर जखमी अवस्थेत मुलीचा शोध लावला. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती अजूनही अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर कारवाई

ही दुर्दैवी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत कळताच शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित दखल घेत पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी समन्वय साधून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याची काळजी घेतली तसेच पोलीस आयुक्तांशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेला आणि तपासाला प्राधान्य देण्यास सांगितले.

“आपल्या समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक सर्वात असुरक्षितांवर अत्याचार करून सुटतील असे समजतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे शायना एनसी यांनी सांगितले. “परंतु यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊ. या निरपराध दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.”

संबंधित यंत्रणांनी तपासाला गती द्यावी, पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शायना एन सी यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

Lift of 18-storey building collapses in Mumbai's Byculla

Mumbai News: मुंबईतील भायखळा येथील १८ मजली इमारतीत लिफ्ट कोसळली पाच जण जखमी; तपास पथक स्थापन

Mumbai News: मुंबईतील भायखळा परिसरातील जय कृपा टॉवर या निवासी इमारतीत बुधवारी रात्री अचानक लिफ्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *