गोविंदा प्रथमेश सावंतचे निधन…. दिड महिन्यापासून उपचार सुरू होते

घाटकोपर परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून गंभीर जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचे शनिवारी केईएम रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो २० वर्षांचा होता. साधारण दीड महिन्यांहून अधिक काळ त्याची रुग्णालयात मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. प्रथमेशच्या मृत्युमुळे करीरोड परिसरात शोककळा पसरली.

प्रथमेशच्या लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या बहिणीचेही निधन झाले. त्यानंतर त्याच्या काका-काकीने त्याचा सांभाळ केला. परळ येथील एम. डी. महाविद्यालयात इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमेश औद्योगिक शिक्षण घेत होता. सकाळी वृत्तपत्र वाटप करून झाल्यानंतर तो महाविद्यालयात जायचा. त्यानंतर सायंकाळी खाद्यपदार्थ डिलिवरीचे काम तो करायचा.

यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात थर रचताना जखमी होऊन एकूण तीन गोविंदांचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडण्याचा सराव करताना भांडूपमधील प्रथमेश परब जखमी झाला होता. त्यातच त्याचे निधन झाले. त्यानंतर थर कोसळून विद्याविहार येथील गोविंदा संदेश दळवी गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संदेशचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता.

राज्य सरकारने कोरोनाविषयक निर्बंध हटविले असून यंदा सर्वच उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे होत आहेत. यामुळे दहीहंडीच्या दिवशीही गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह होता. अनेक दहीहंडी पथकांतील गोविंदांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची चुरस लागली होती. दहिकाल्याच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी करीरोड येथील साईभक्त गोविंदा पथक घाटकोपर येथे दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. घाटकोपरमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळला आणि थरात उभा असलेला प्रथमेश गंभीर जखमी झाला.

तातडीने प्रथमेश रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून ते रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल असताना साईभक्त गोविंदा पथकातील काही युवक त्याची सुश्रुशा करीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपये मदत म्हणून दिले होते. तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे डॉक्टर प्रथमेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. काही गोविंदा पथकांनीही त्याला आर्थिक मदत केली होती.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *