बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी अटक केलेला काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरेला (४२) उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. तसेच, त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेशने आपली अटक बेकायदेशीर असून आपल्याला ठोठावण्यात आलेली पोलीस व न्यायालयीन कोठडी रद्द करावी, अशी मागणी करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे, त्याची अंतरिम जामिनावर तातडीने सुटका करण्याची मागणी केली होती. न्या. रेवती-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने प्रकरणातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर गणेशची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी, प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचे आदेशही पोलिसांना दिले. हे प्रकरण स्पष्टपणे बेदरकारपणे गाडी चालवण्याचे आहे. दुसरीकडे, याचिकाकर्ता हा मद्यपान करून गाडी चालवत नव्हता. तरीही, या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कसा दाखल करण्यात आला, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. हे असे असेल तर अपघातांच्या सगळ्याच प्रकरणात हे कलम लावावे लागेल, अशी टिप्पणी करताना पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे न्यायालयाने सुनावले.
तत्पूर्वी, चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयाजवळ ५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळी गणेश याच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात, दुचाकीस्वार जखमी झाला होता. गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्याच्यावर केवळ जामीनपात्र आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११० नुसार सदोष मनुष्यवधाचा अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आला हे गणेशच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय, गणेशला काही गंभीर आजार असल्याने त्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही करण्यात आली.
दरम्यान, सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात गणेशचा जामीन अर्ज नाकारला होता. पुराव्यांचा विचार करता गणेशने दुचाकीला धडक जखमीला काही अंतरापर्यंत फरफरट नेले, तसे केल्यानंतर तेथून पळ काढला, असे सत्र न्यायालयाने गणेशला जामीन नाकारताना नमूद केले होते. मधुमेही असल्याने आपल्याला दृष्टीदोष आहे. त्यातूनच हा अपघात झाल्याचा गणेशचा दावाही सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. आरोपी आणि जखमी एकाच परिसरात राहतात. शिवाय, प्रत्यक्षदर्शींचे जबाब अद्याप नोंदवायचे आहेत. अशा टप्प्यावर आरोपीला जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने गणेशचा जामीन नाकारला होता.
Marathi e-Batmya